लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिका स्थायी समिती सदस्य गणेश भोसले, कुमार वाकळे, योगिराज गाडे यांच्यासह आठ सदस्य सोमवारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे स्थायी समिती निम्मी रिकामी झाली असून, नवीन सदस्यांची नियुक्ती होते की आठ सदस्यांवर कामकाज चालणार, याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका स्थायी समितीचे सदस्य गणेश भोसले, कुमार वाकळे, सुभाष लोंढे, योगिराज गाडे, सुवर्णा जाधव, मुद्दसर शेख, आशा कराळे, सोनाली चितळे हे निवृत्त झाले आहेत. स्थायी समितीचे निम्मे म्हणजे आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होत असतात. ज्या सदस्यांची सोडतीत चिट्टी निघणार नाही, असे सदस्य दोन वर्षांनी आपोआप निवृत्त होत असतात. त्यानुसार दोन वर्षांनी हे सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यासाठी सभा घेण्याबाबतचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने महापौरांना सादर केला आहे. परंतु, महापौर कायार्लयाकडून महासभेबाबत कोणताही निरोप नाही.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांचे, तर भाजपकडून स्वप्नील शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, सेनेचे दोन सदस्य स्थायी समितीत येणार आहेत. सेनेत दोन गट आहेत. यापैकी कोणत्या गटाला संधी मिळते, यावर बरेच काही अवंलबून आहे. याशिवाय बसपाचे मुद्दसर शेख हे ही निवृत्त होत आहेत. बसपाकडून शेख यांनी सभापतीपद भूषविलेले आहे. त्यामुळे बसपाकडून माजी सभापती सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती होऊ शकते. तसे झाल्यास जाधव याही सभापती पदाच्या स्पर्धेत असतील. त्यामुळे सभापती पदासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
....
महापौर आमदारांच्या भूमिकेकडे इच्छुकांच्या नजरा
नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सभा बोलविण्याचा अधिकार महापौरांना आहे. पण, महापौरांनी सभा घेऊन सदस्यांची नियुक्ती केल्यास सभापती पदासाठी निवडणूक लागेल. त्यामुळे महापौरांसमोरही पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे सभापती पदासाठी इच्छुक असून, भाजपचे मनोज कोतकर यांना भाजपमधून आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीत आणले व सभापती केले. नव्याने सभापती पदाची निवडणूक जाहीर झाल्यास कोतकर यांना चार महिन्यांतच राजीनामा द्यावा लागेल. आमदार जगताप याबाबत काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
..