अहमदनगर : राज्यामधील सरकारी नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेली पदे भरण्यासाठी लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळाने मंत्री कडू यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाला वरील आश्वासन दिले.
राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिकांची १२३१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबीयांची संख्या अल्प प्रमाणात आहे, तरीही शिक्षण विभाग ही पदे भरण्यास उत्सुक नव्हता. शासनानेही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे माजी सैनिक, वीरपत्नी, वीर पाल्य यांनी १६ डिसेंबर या विजयदिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिष्टमंडळास मंत्रालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. यावेळी मंत्री कडू यांनी शिष्टमंडळाशी गत बुधवारी (दि. २) सकारात्मक चर्चा केली. तसेच लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबवून माजी सैनिकांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शिष्टमंडळाला लेखी आश्वासन न मिळाल्याने माजी सैनिक उपोषणावर ठाम आहेत. या शिष्टमंडळात सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार बिग्रेडिअर सुधीर सावंत, कार्यकारी अध्यक्ष नारायण अंकुशे, कोकण विभागप्रमुख सुभाष दरेकर, माजी सैनिक उमेदवार सुभेदार मेजर प्रभाकर काळे, माजी सैनिक अमर माने, माजी सैनिक राजेंद्र राजळे आदी उपस्थित होते. शिक्षण विभागातर्फे सहसचिव इम्तियाज काझी, कक्ष अधिकारी कविता तोंडे, प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
---
----
सैनिक हा वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतो. इतर सेवेमध्ये ही अट वयाच्या ५८ वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे सैनिकांना सेवानिवृत्त करण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार राज्यातील सेवेमध्ये सामावून घ्यावे.
-बिग्रेडिअर सुधीर सावंत, (निवृत्त)
--
फोटो- ०८ माजी सैनिक
माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी सुधीर सावंत यांच्यासह राज्यातील माजी सैनिक संघटनेचे विभागीय प्रतिनिधी.