अहमदनगर : विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी नगर येथे पत्रकारांशी बोलताना केला.
थोरात म्हणाले, महाविकास आघाडीत पदांचे वाटप झालेले आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी अध्यक्षांची निवड करणे आवश्यक आहे. येत्या १ मार्चपासून अधिवेशन आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत अध्यक्षांची निवड करण्यात येईल. पुढचा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, असे थोरात म्हणाले.
राज्यपालांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. परंतु, त्याचा सरकारशी काहीही संबोध नाही. ही प्रशासकीयबाब आहे. विधानपरिषदेच्या १२ जागांची मागणी राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे. पण, त्याचा आणि विमान प्रवासाचा कुठलाही संबंध नाही, असे थोरात यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले.
....
नगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच
राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याचा मेळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होईल, ते आता सांगता येणार नाही. परंतु, पुढचा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल, असे थोरात म्हणाले.