शिर्डी : साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी व शिर्डीचे प्रांताधिकारी म्हणून कुंदन सोनवणे यांनी नुकताच दोन्हीही पदाचा कार्यभार स्वीकारला़अजय मोरे यांची अंमळनेर प्रांताधिकारी बदली झाली आहे़ त्यांच्या जागी आलेल्या कुंदन सोनवणे यांनी दुपारनंतर शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयाचा, तर सायंकाळी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला़ सोनवणे यांनी यापूर्वी राहाता तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली असल्याने त्यांना शिर्डी व परिसराची ओळख आहे़ सध्या संस्थानचे कार्यकारी पद रिक्त असल्याने गेल्या दहा महिन्यांपासून शिर्डी प्रांताधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे़ यामुळे शिर्डी प्रांताधिकाऱ्यांना अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे संस्थानचे कार्यकारी अधिकारीपद बोनसमध्ये मिळत आहे़संस्थानचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा श्रीगणेशाही केला़ संस्थान परिसरात प्रवेश करताच सोनवणे यांनी महाद्वारावर निवांतपणे खुर्च्या टाकुन बसलेल्या पोलिसांच्या खुर्च्या काढुन घेतल्या व त्यांना उभे राहुन पहारा देण्याच्या सूचना दिल्या़मिनीमम गव्हर्मेंट मॅक्झिमम गव्हर्नन्सबरोबरच पेपरलेस कामकाज करण्यावर आपला भर राहिल़ शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधेकडे लक्ष देतानाच प्रांताधिकारी म्हणून नागरीकांची गैरसोय होणार नाही याकडे आपण कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ यावेळी उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे उपस्थित होते़ (वार्ताहर)
शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी सोनवणे
By admin | Updated: June 13, 2014 01:13 IST