राहुरी तालुक्यातील एका गावात आरोपीच्या आईचे मयत चांगदेव शंकर टिळेकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट आरोपीस कायमच खटकत होती. त्यामुळे शनिवारी (दि. २४) रात्री आठ वाजेदरम्यान आरोपीने टिळेकर यांचा गळा दाबून खून केला. टिळेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना फोन करून आरोपीने सांगितले. आरोपी अंत्यविधीची घाई करत होता. यावेळी टिळेकर यांची मुलगी रूपाली बनकर यांना संशय आला. त्यांनी मयत चांगदेव टिळेकर यांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. लोणी येथे मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यात आला. टिळेकर यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे अहवालातून समोर आले.
याप्रकरणी रूपाली अजय बनकर (रा. कर्वेनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करीत आहेत.