दुसऱ्या लाटेत तरुणांचा मृत्यू : आईवडिलांवर दु:खाचे संकट
(डमी)
श्रीरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक राहिले. विशेषत: २५ ते ४० या वयोगटातील तरुणांचे एकूण मृत्यूमधील प्रमाण जास्त होते. आई-वडिलांचा एकमेव आधार असलेला मुलगा कोरोनामुळे हिरावला गेला, अशा घटना पहायला मिळाल्या. सरकारने या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी आता पुढे आली आहे. रोग प्रतिकारक शक्ती असल्यामुळे तरुण वर्गाने दुसऱ्या लाटेमध्ये काहिसा निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे त्यांच्यातील संसर्गाचे प्रमाण लक्षणीय दिसले. लॉकडाऊनमध्ये आवश्यक तसेच काही अनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडल्याने तरुणांना संसर्ग झाला. वेळीच उपचार न घेतल्यामुळे तरुणांनाही प्राणवायूची गरज पडली.
नगर जिल्ह्यामध्ये तरुणांचा मृत्युदर चिंताजनक राहिला. पहिल्या लाटेमध्ये १६ ते ४५ वयोगटातील ३० हजार जण संक्रमित झाले. एकूण मृत्युदरामध्ये दुसऱ्या लाटेत याच वयोगटातील २८५ जणांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचा मृत्युदर हा तब्बल ७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला. काही ज्येष्ठ पालकांनीही ऐन उमेदीतील पाल्य गमावले. उदरनिर्वाहासाठी एकुलत्या एक मुलावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ पालकांवर आता मोठे संकट ओढवले आहे.
------
कोरोनाचे एकूण रुग्ण : २,६७,९९९
बरे झालेले : २,५७,०७५
उपचार घेत असलेले :६,४४१
एकूण मृत्यू : ३,४८३
----------
कोरोनामुळे एकुलता एका मुलगा हिरावून घेतलेल्या ज्येष्ठांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये. त्यांना योजनेतून आर्थिक मदत करावी. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा.
- नवनाथ अकोलकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
--------
ज्या ज्येष्ठ मंडळींनी कोरोनामध्ये मुलगा गमावला आहे, त्यांच्याकरिता सरकारने एक दीर्घकालीन योजना आखली पाहिजे. ज्येष्ठांच्या संघटना तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन मानसिक आधार देण्याची गरज आहे.
- लक्ष्मणराव निकम, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा, श्रीरामपूर
------