कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत संपूर्ण शहराला आठ दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार शहरातील पोलीस स्टेशन परिसर, गोदाम गल्ली, गोखरूबाबा गल्ली येथे मंगळवारी (दि. २०) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक तास चाललेल्या पाणीपुरवठ्यात पूर्णतः माती मिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
कोपरगाव शहराची लोकसंख्या सुमारे १ लाखाच्या जवळपास असून, घरांची संख्या २२ हजार इतकी आहे. नागरिकांना नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपरिषदेच्या जलवाहिन्यांना सततची गळती लागलेली असते. काही जलवाहिन्या तर गटारीमध्येच फुटलेल्या असतात. त्यामुळे गटारीचे पाणी या जलवाहिन्यांमध्ये आठ दिवस साचले जाते. ज्यादिवशी पाणीपुरवठा केला जातो. त्या दिवशी हेच पाणी घरातील नळांना येते आणि विशेष म्हणजे एक ते दीड तास पाणी सुरु राहिल्यानंतरही चांगले पाणी येतच नाही.
...........
सध्या रमजान महिन्याचे उपवास सुरु आहेत. त्यामुळे दिवसभर पाणी न पिता उपवास सोडताना पाणी प्यावे लागते. परंतु, नगरपरिषदेकडून आठ दिवसाला पाणी देण्यात येते. त्यातही अशा पद्धतीने गढूळ पाण्याचा पुरवठा केल्यास पाणी कसे प्यायचे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक, नगरपरिषद यांच्याकडे तक्रार केली, तर पाईपलाईनचे काम केले असल्याने पाणी गढूळ आले. काळजी करू नका थोड्या वेळात पुन्हा पाणी सोडू, असे आश्वासन दिले. मात्र, पुन्हा पाणी काही आलेच नाही.
- हारून मन्सुरी, नागरिक, कोपरगाव.
.............
सर्वांना एकाचवेळी पाणी देता यावे; यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ खोदाई करून पाईलाईनची जोडणी केली आहे. त्यामुळे या जोडणीदरम्यान पाईपलाईनमध्ये माती गेली असल्याने पाणीपुरवठ्यावेळी पाणी गढूळ झाले. मात्र, ही संपूर्ण पाईपलाईन स्वच्छ करून या परिसरातील नागरिकांना दोन दिवसात पुन्हा शुद्ध पाणी देण्यात येईल.
- ऋतुजा पाटील, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न. प., कोपरगाव
.............
फोटो२०- गढूळ पाणी - कोपरगाव