अहमदनगर: अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सोमवारी राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले़धनगर समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन हाती घेण्यात आले आहे़ जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने त्यास मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून पाठिंबा दिला जात आहे़ या पार्श्वभूमीवर नगरसेवक दिगंबर ढवण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला़ भर पावसात जुने बसस्थानक येथे धनगर समाजातील कार्यकर्ते एकत्र आले़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जीपीओ चौक मार्गे धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ गळ्यात पिवळ्या रंगाचे पंचे घातलेल्या समाज बांधवांनी यळकोट यळकोट जय मल्हार, चा नारा देत आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ भंडाऱ्याची उधळण केली़ मोर्चात धनगर समाजाचे निवृत्त दातीर, गंगाधर तमनर, अण्णासाहेब बाचकर, विजय तामनर, ज्ञानेश्वर बाचकर आदींचा समावेश होता़ आमदार अनिल राठोड, संभाजी दहातोंडेही यावेळी उपस्थित होते़(प्रतिनिधी)आदिवासी नेत्यांना फिरू न देण्याचा इशाराराज्याचे आदिवासीमंत्री तथा पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर यावेळी सडकून टीका करण्यात आली़ पिचड आदिवासी नसल्याचे सांगून त्यांनी जनतेसमोर सत्य मांडावे़ त्यांनी धनगर समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा अकोल्यासह राज्यातील आदिवासी नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जय मल्हार’ चा नारा
By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST