कर्जत : कर्जत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुदैवाने कामाची सुट्टी झाल्यावर ही घटना घडल्याने या घटनेबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली. कर्जत न्यायालयाला अद्यावत इमारत मिळावी म्हणून पालकमंत्री राम शिंदे यांनी मोठे प्रयत्न करून निधी मंजूर करून दिला. या इमारतीच्या कामासाठी राज्य शासनाने ४ कोटी २९ लाख रुपये मंजूर केले. कर्जत-राशीन रोडलगत हे काम सुरू आहे. बांधकाम पूर्ण झाले आहे. आता प्लास्टर फरशी व इतर कामे सुरू आहेत. गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या पश्चिम भागाकडील बाहेरच्या भागातील स्लॅब कोसळला. सुदैवाने यावेळी मजुरांची सुटी झाली होती. यामुळे जिवीतहानी झाली नाही. या घटनेबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली. शुक्रवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व इतरांनी या भागाची पाहणी केली. उर्वरित स्लॅब पाडण्याच्या सुूचना दिल्या व हे काम पुन्हा नव्याने करण्याचे ठेकेदारास सांगण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी समजताच कर्जतमध्ये एकच चर्चा सुरू झाली. कर्जत तालुका वकील संघाच्या वतीने या कामाबाबत यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता व जिल्हा न्यायाधीश यांना निवेदन देऊन या कामाची तक्रार करण्यात आली होती. त्यांनी या कामाच्या दर्जाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अधिकारी व ठेकेदार यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. या तक्रारीवरून जिल्हा न्यायाधीश यांनी गुरुवारी दुपारीच या इमारतीच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर सायंकाळी स्लॅब कोसळला. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचा स्लॅब कोसळल्याने कर्जत तालुका वकील संघाची मागणी रास्त होती ही बाब पुढे आली आहे.
कर्जत न्यायालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:16 IST