अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : सलग तिसऱ्या दिवशीही अनेक भागात वादळी पावसाचा तडाखा बसला. विजेच्या तारांवर झाड पडून रोहित्रांमध्ये बिघाड होऊन करंजीसह सोळा गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहेत. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून अनेकजण बेघर झाले आहेत. विजेअभावी जनजीवन विस्कळीतकरंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसून करंजीसह सोळा गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी सायंकाळी करंजीसह मिरी, कामतशिंगवे, शंकरवाडी, केशव शिंगवे, देवराईसह सोळा गावांमध्ये जोरदार वादळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोठी झाडी उन्मळून पडली. काही ठिकाणी तारा तुटल्या. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाला. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील सोळा गावे अंधारात आहेत. ‘महावितरण’ चे कर्मचारी नॉटरिचेबल आहेत तर कार्यालयीन दूरध्वनी लागत नाहीत. त्यामुळे वीज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे वीज पुरवठा लवकर सुरळीत होण्याची शक्यता धूसर आहे.वादळी वाऱ्यामुळे ‘महावितरण’ चे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे तांत्रिक बिघाड काढण्यास विलंब होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज खांब आडवे झाले आहेत. तर शेतात तारांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका आहे. खानापूर भागात पाऊसखानापूर : शेवगाव तालुक्यातील खानापूर, कऱ्हेटाकळी, घोटण, गदेवाडी भागात गुरुवारी तिसऱ्या दिवशीही वादळी पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास झालेल्या या पावसामुळे झाडी उन्मळून पडली. काही ठिकाणी वीज खांब पडले. शेवगाव-पैठण मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर झाडी पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. कऱ्हेटाकळी येथील रावसाहेब गायके या शेतकऱ्याचे घराचे छत वादळाने उडाले. व्हरांड्याच्या विटांचा मार लागून ते जखमी झाले. त्यांची दोन वर्षाची नातही यामध्ये जखमी झाली. या घटनेने ते बेघर झाले आहेत. हा प्रकार सांगताना त्यांचे डोळे भरुन आले होते. तीस गावांना तडाखा शेवगाव : तालुक्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत जवळपास सत्तर गावातील सोळा हजार शेतकऱ्यांचे सुमारे सोळा ते सतरा कोटींचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसात तालुक्यातील सुमारे तीस गावांना वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. माळेगावने येथे बावीस वर्षीय शेतकरी वीज पडून दगावला. ढोरजळगाव-ने येथे जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर संकट कोसळले. (तालुका प्रतिनिधी, वार्ताहर)फळझाडांना फटकानेवासा तालुक्यातील चांदा शिवार तसेच बऱ्हाणपूर, रस्तापूर, हनुमानवाडी, लोहारवाडी, हिवरा व परिसरातील वाड्या-वस्त्यांना गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. जोराच्या गारपिटीमुळे कपाशी, कांदा व फळझाडांचे मोठे नुकसान झाले आहे. चांदा येथील तिरमल वाडी, शास्त्रीनगर, जुना घोडेगाव रस्ता, बऱ्हाणपूर शिवार तसेच मिरी रस्ता भागात झालेल्या वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे, कांद्याचे शेड उडाले. नेवाशाच्या तहसीलदार हेमलता बडे यांनी शुक्रवारी शिवारातील नुकसानीची पाहणी करुन पंचनाम्याचे आदेश दिले.
करंजीसह सोळा गावे अंधारात, चांद्यात गारपीट
By admin | Updated: June 7, 2014 00:19 IST