पारनेर : तालुक्यातील अळकुटी येथे मंगळवारी दरोडेखोरांना ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत दोघा दरोडेखोरांचा मृत्यू झाला़ त्यानंतर पारनेर पोलिसांनी एका कुख्यात दरोडेखोराला अटक केली असून, जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा या दरोडेखोराकडून उलगडा होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले़पारनेर पोलिसांनी तालुक्यातील वाघुंडे येथून एका दरोडेखोराला ताब्यात घेतले असून, दुसरा दरोडेखोर अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येते़ अटक केलेल्या दरोडेखोराची चौकशी सुरु असून, त्याच्याकडून जिल्ह्यातील इतर दरोड्यांची माहितीही मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ अळकुटी येथे दरोडेखोरांना कोणी मारहाण केली व दरोडा टाकण्यात कोण सहभागी होते याची माहिती या अटक झालेल्या दरोडेखोराकडून मिळणार असल्याने जिल्ह्यातील दरोड्यांचे मुख्य धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहे़ पोलिसांनी पकडलेला हा दरोडेखोर आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे का, याची माहिती पोलीस घेत आहेत़अळकुटीमध्ये मागील आठवड्यात रात्री दरोडेखोरांनी धुडगुस घातला होता. चिडलेल्या ग्रामस्थांनी दोन दरोडेखोरांना पकडून जबर मारहाण केली़ या मारहाणीत ऋषीकेश पुंज्या चव्हाण व राहुल पुंज्या चव्हाण (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) हे दोघे मृत झाले. या दोघांसह शब्बीर पुंंज्या चव्हाण (रा़ सुरेगाव ता़ श्रीगोंदा) यांच्या विरोधात अळकुटीतील दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जखमी असलेला शब्बीर पुंज्या चव्हाण याने नगर येथील शासकीय रूग्णालयात दिलेल्या जबाबानुसार पारनेर पोलिसांनी दोन जणांच्या मृत्युप्रकरणी दोन जणांसह अळकुटी ग्रामस्थांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सध्या दरोडा व दोन दरोडेखोरांच्या मृत्युप्रकरणी दाखल झालेला गुन्हा या दोन्हीचा तपास पोलिस उपअधिक्षक वाय. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद जांभळे व पोलिस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दरोड्यांचे धागेदोरे उलगडणार
By admin | Updated: October 28, 2014 01:00 IST