अहमदनगर : शिक्षकाच्या तोंडात मारून शिविगाळ करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी एक वर्षे साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.रावसाहेब सावळेराम गोंडाळ (रा. गोंडाळ वस्ती, चास) आणि प्रवीण सुरेश चिपाडे ( रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. नगर तालुक्यातील चास येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत २० फेब्रुवारी २०१३ रोजी केंद्रप्रमुख रोहिदास नामदेव पादीर (रा. हिवरेबाजार, ता. नगर) हे काम करीत होते. यावेळी आरोपींनी पादीर यांना, तुम्ही कोण आहात, आमच्या वस्तीवरील शाळेत शिक्षक का येत नाहीत, त्यांना प्रशिक्षणासाठी कोणी पाठविले, याबाबत आम्हाला लेखी उत्तर हवे आहे. पादीर यांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावसाहेब गोंडाळ याने पादीर यांच्या तोंडात मारून शिविगाळ केली. तसेच तुझ्याकडे पाहतो, नोकरीवरून काढून टाकतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी पादीर यांनी त्याच दिवशी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
शिक्षकाच्या तोंडात मारणाऱ्या दोघांना साधी कैद
By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST