अहमदनगर : शिर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे शिर्डी शहराला मुळा धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली जिल्हाप्रशासनाकडून सुरू आहेत़ त्याचबरोबर कोपरगाव व राहाता शहरावरही जलसंकट ओढावले आहे़शिर्डी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ५८० कोटी लीटरचा तलाव आहे़ या तलावाने तळ गाठला आहे़ येत्या २७ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा तलावात शिल्लक आहे़ नांदुरमधमेश्वर धरणाच्या पाण्याने तलाव भरला होता़ परंतु, तलावाची पाणीपातळी खालावली़ त्यामुळे सध्या शिर्डी शहराला नऊ दिवसांतून एकदा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ तलावातील पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न नगरपंचायती समोर निर्माण झाला आहे़ नगरपंचायत प्रशासनाने मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे़ शिर्डीपासून मुळा धरण ७० किलोमीटर अंतरावर आहे़ मुळा धरणातून टँकरने पाणी आणण्याचा पर्याय पुढे आला असून, त्यासाठी ४० टँकरची मागणी जिल्हाप्रशासनाकडे करण्यात आली आहे़ शहराच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी मुळा धरण एकमेव पर्याय असल्याचे सुत्रांनी सांगितले़जून महिना अर्धा संपला़ मात्र अद्याप पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील तलावानेही तळ गाठला आहे़ तलावातील पाणी पातळी खालावल्याने कोपरगाव शहराला सध्या दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो़ पाण्याची बचत व्हावी, यासाठी पाणीपुरवठा घट करण्यात आली आहे़ किती बचत केली तरी हे पाणी येत्या १३ जुलैपर्यंतच पुरेल़ त्यानंतर मात्र कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे़ ही गरज लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने टँकरची मागणी केली आहे़ जिल्हाप्रशासनाने जामखेड येथील टँकर कोपरगावला पाठविले आहेत़ टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केलेल्या विहिरीतून टँकरव्दारे कोपरगाव शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ राहाता शहराची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ राहाता नगरपालिकेकडून जिल्हाप्रशासनाकडे टँकरची मागणी झाली आहे़ प्रस्ताव टंचाई शाखेला प्राप्त झाला असून, शिर्डी, कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील टँकरची भर पडणार आहे़ (प्रतिनिधी)
साई दरबारी पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: June 16, 2016 23:58 IST