कोपरगाव : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्पअंतर्गत उपग्रह तयार करण्यात आले. त्याचे ७ फेब्रुवारीला प्रक्षेपण करण्यात आले. त्यासाठी कोपरगाव येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सिद्धी बोधे या मोहिमेत सहभागी झाली होती. तिची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
देशभरातील १ हजार तर राज्यातील ३५४ विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. जगात सर्वांत कमी वजनाचे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम चे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर हेलियम बलूनद्वारे प्रस्थापित करण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता. सिद्धी बोधे या विद्यार्थ्यांनीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, स्पेस झोन इंडिया रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकाॅर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड नामांकन मिळविले, तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी पूजा संजय जोशी हिने कोरोना काळात आंतरराष्ट्रीय योगा दिन, नारी शक्ती प्रश्नमंजूषा, रयत विज्ञान परिषदमार्फत आयोजित केलेल्या प्रश्न मंजूषा स्पर्धा, सूर्यतेज संस्था आयोजित शिवजयंती उत्सव चित्रकला स्पर्धा, भारत सरकार यांचे अवकाश संशोधन विभागामार्फत आयोजित निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले. या उत्तुंग यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे प्राचार्या मंजूषा सुरवसे यांनी कौतुक केले.