श्रीरामपूर : पोलिसात फिर्याद दिली म्हणून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहसीन कुरेशी ऊर्फ बुंदी याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, श्रीरामपूर शहरात शस्त्रांची अवैध विक्री करणारी टोळी असल्याचा संशय पोलिसांना असून त्याचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. गोळीबाराच्या घटनेत इरफान शेख हा तरुण जखमी झाला आहे.श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोनमध्ये गुरुवारी रात्री गोळीबाराची ही घटना घडली. कुरेशी याने इरफान फारूक शेख या तरुणावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. इरफान शेख पळून गेल्याने तो बचावला. मात्र, या घटनेत तो जखमी झाला आहे. घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी काडतुसाच्या मोकळ्या पुंगळ्या सापडून आल्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रात्रीच पोलिसांनी मोहसीन कुरेशी ऊर्फ बुंदी याला अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. देशमुख यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले.पोलिसांच्यावतीने सरकारी वकील चंद्रलेख पगारे यांनी बाजू मांडत आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. गोळीबार करण्यासाठी मोहसीन कुरेशी याने गावठी पिस्तुल कोठून आणले, तसेच ते पिस्तुल जप्त करणे बाकी असून गोळीबार करण्यासाठी वापरलेली मोटारसायकलही हस्तगत करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील पगारे यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने कुरेशी याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुभेदार वस्ती भागातील कुरेशी मोहल्ल्यात शिरखुरम्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शेख व कुरेशी यांच्यात वादावादी झाली होती. त्याची तक्रार शेख यांनी पोलिसांत दिली. पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून कुरेशी याने शेख यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, श्रीरामपुरात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर शहरात शस्त्रांची अवैध विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळदे यांनी तसा संशय न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. (प्रतिनिधी)
श्रीरामपुरात अवैध शस्त्रांची विक्री करणारी टोळी?
By admin | Updated: July 30, 2016 00:32 IST