लाडजळगाव : शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामदैवत तसेच परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान, नागलवाडी येथील सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारी यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती बाबागिरी महाराज यांनी दिली आहे.
देवस्थान गोळेगावपासून तीन किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात आहे. या ठिकाणी महादेवाची स्वयंभू पिंड आहे. रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्र व सीता या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते, अशी आख्यायिका आहे. शेवगाव तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान ओळखले जाते. प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे येत असतात, तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असून, मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्त येथे हजेरी लावत असतात; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने याही वर्षी ही यात्रा रद्द केली जात आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे देवस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
---
तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या या दुर्लक्षित व उपेक्षित देवस्थानसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्गात समावेश करून घेतला. भक्तनिवास इमारतीच्या बांधकाम कामासाठी ४० लाख रुपये मंजूर झाल्याने या देवस्थान विकासात मोठी भर पडली आहे.
-हर्षदा काकडे,
जिप सदस्या, लाडजळगाव गट