श्रीगोंदा : गडचिरोली जिल्ह्यातील पैंडी जंगलात नक्षलवाद्यांनी विशेष पोलीस पथकावर सशस्त्र हल्ला केला. त्यावर महाराष्ट्र पोलीस जवानांनी १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या थरारक मोहिमेत श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांनी काही नक्षलवाद्यांचा खात्मा केला. प्रेमकुमार दांडेकर यांनी बुद्धीकौशल्याने केलेल्या कामगिरीवर गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
२१ मेच्या पहाटे पैंडीच्या जंगलात ४० सशस्त्र नक्षलवादी व पोलीस जवान आमने-सामने आले होते. फायरिंग सुरू झाली. विशेष पोलीस पथकाच्या पहिल्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी दुसरी तुकडी पहिल्या तुकड्याच्या मदतीला धावली. दोन तुकड्यांमधील जवानांचा आक्रमकपणा पाहून नक्षलवादी पळू लागले. त्यावर तिसऱ्या तुकडीने नक्षलवाद्यांना समोरून घेरले. १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांनी आपल्या एके ५६ रायफलमधून काही नक्षलवाद्यांचा कंठस्नान घातले आणि सहकारी बांधवांचे प्राण वाचविले.
प्रेमकुमार दांडेकर यांनी या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली. याची दखल विशेष पोलीस पथकाचे प्रमुख मनीष कलवानिया व जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घेतली. प्रेमकुमार दांडेकर हे २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले होते.
---
२२ प्रेमकुमार दांडेकर