अहमदनगर : छत्रपती शरीफजींच्या भातोडीतील (ता.नगर) समाधीदर्शनाने वंशज गहिवरले. मूळ पुरूषाच्या दर्शनाचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. भग्नावस्थेतील समाधीस्थळी स्मारक उभारण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. ‘लोकमत’ने इतिहासाचा वर्तमानात हा सुवर्णयोग जुळून आणला.छत्रपतींचे चुलते शरीफजीराजेंची समाधी भातोडी येथे आहे. मात्र, दुर्लक्षित राहिल्याने भग्न पावली होती. इतिहासप्रेमींनी नंतर ती शोधून काढली. ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे त्यावर प्रकाश टाकल्यानंतर हा इतिहास समाजासमोर आला. छत्रपतींच्या वंशजांनाही याबाबत समजले. त्यानंतर त्यांनी समाधीदर्शनाचा बेत आखला. यात इतिहासप्रेमी किशोर कदम यांचाही मोठा वाटा आहे. विविध ठिकाणी विखुरलेल्या शरीफजींच्या वंशजांनी एकत्र येत सोमवारी दर्शन घेतले. शरीफजींचे अकरावे वंशज अॅड. युवराज राजेभोसले (खानोटेकर), शाहू राजेभोसले (टिटवेकर), अण्णासाहेब राजेभोसले (टिटवेकर), नितीन शिवाजीराव राजेभोसले, नितीन राजेभोसले, शाहू संभाजी राजेभोसले, अमरसिंह सुमेरसिंह राजेभोसले, धैर्यशील चंद्रशेखर राजेभोसले (चावरेकर) आदींनी समाधीदर्शन घेतले. यानंतर समाधीशेजारी कार्यक्रम झाला. त्यावेळी सरपंच बबनराव घोलप, विश्वनाथ कदम, त्रिंबक कचरे, भाऊसाहेब धलपे, ग्रामसेवक बळीद, इतिहासप्रेमी किशोर कदम, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव, सामाजिक कार्यकर्ते अंबादास पंगुडवाले, इतिहास संशोधक प्रमोद मांडे आदी उपस्थित होते. यानंतर शहा शरीफ दर्गा, चौथे शिवाजीमहाराज समाधी, भुईकोट किल्ला आदी ठिकाणी या वंशजांनी भेटी दिल्या. ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट देऊन वंशावळीचीही त्यांनी पाहणी केली. अभिरक्षक यादव यांनी त्यांना जुने दस्तावेज दाखवले. (प्रतिनिधी)भातोडीकरांकडून जोरदार स्वागतछत्रपती शरीफजींच्या घराण्यातील वंशजांचे भातोडी येथे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. गावातील मुलांनी लेझिम पथकाने त्यांचे स्वागत करीत गावातून मिरवणूक काढली. या नंतर वंशजांनी गावातील समाधीवर चादर चढवून विधीवत पूजा केली. नृसिंह मंदिरात दर्शन घेतले.
शरीफजींच्या समाधीदर्शनाने वंशज गहिवरले
By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST