नेवासा : शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी चौकातील अल्पना केक शॉप सोमवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटवून दिले़ या आगीत दुकानातील साहित्य जळून ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद सलीम रफीयोद्दीन उर्फ छोटुभाई शेख यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण होते़ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेवासा शहरातील लक्ष्मी चौक परिसरात अल्पना केक शॉपचे मालक सलीम रफीयोद्दीन उर्फ छोटू भाई शेख हे नेहमीप्रमाणे रविवार रात्री ११ वाजता दुकान बंद करुन घरी गेले़ हे केक शॉपचे दुकान मध्यरात्रीनंतर अज्ञान इसमाने पेटवून दिले. दुकान पेटल्यानंतर या दुकानासमोर राहणारे अस्लमभाई इनामदार यांनी या दुकान मालकास दुकानातून धुर बाहेर येत असल्याचे फोन करुन सांगितल्याने छोटुभाई व इतर दुकानाकडे आले. त्यावेळी नेवासा पोलीस, आजुबाजुचे नागरिकही या ठिकाणी हजर झाले. मुळा व ज्ञानेश्वर कारखान्यांच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात येवून ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या आगीत केक शॉप जळून खाक झाले असून, सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली़ या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे हे करत आहेत. यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक पाटील यांची भेट घेऊन एका संशयिताचे नाव सांगून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ मात्र, पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत कोणालाही अटक केली नव्हती़ (तालुका प्रतिनिधी)
दुकान पेटविले
By admin | Updated: July 15, 2014 00:45 IST