साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीच संपूर्ण अर्थकारण ढासळले. जवळपास सगळेच बेरोजगार झाले आहेत. उत्पन्न पूर्ण थांबले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकांच्या जप्तीच्या व वीज महामंडळाच्या वीज तोडणी कारवाया सुरू आहेत. नगरपंचायतचे करांसाठी तगादे आहेत. शिर्डीकर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आले आहेत. भाविक दर्शनाला आतूर झाले आहेत. मंदिर खुले केले तर भक्तांना आत्मिक समाधान व शिर्डीकरांच्या रोजीरोटीचा मार्ग पुन्हा उघडणार आहे. देशभरातील तिरूपतीसारखी देवालये उघडी असताना महाराष्ट्रातील शिर्डीसारखी देवालये कुलूपबंद आहेत. मंदिर उघडण्यासाठी भाजयुमोसह विविध सामाजिक संघटनांनी मागणी करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने आजचे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजक भाजयुमोचे सचिन तांबे यांनी सांगितले.
यापूर्वी सरकारला निवेदन दिले, आज आंदोलन केले. यानंतर देश आणि विदेशातील भाविकांना बरोबर घेऊन राज्य सरकारला मेल केले जाणार आहेत. याशिवाय राज्यपालांचीही भेट घेण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, बाळासाहेब गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अॅड. अनिल शेजवळ, सुनील लोंढे, मयूर चोळके, चेतन कोते, आकाश त्रिपाठी, बबलू वर्पे, आकाश वाडेकर, सुनील गांगुर्डे, अमित कुटे, सचिन आरणे यांनी सहभाग घेतला. साईदर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा व अर्थकारणाचा रुतलेला शिर्डीसह पंचक्रोशीचा गाडा सुरळीत व्हावा, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, अॅड. अनिल शेजवळ यांनी केली.