शिर्डी : आश्वीतील गॅस्ट्रोच्या साथीपाठोपाठ आता शिर्डीत डेंग्यूने थैमान घातले आहे़ विविध रुग्णालयांमधून शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत़ महिन्यापूर्वी सुस्तावलेला डेंग्यू पुन्हा जोमाने सक्रिय झाला आहे तर शासकीय यंत्रणा तितक्याच जोमाने सुस्तावली आहे़ शिर्डीतील कचरा समस्येने विविध आजारांना पूरक वातावरण निर्माण केले आहे़ त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा फैलाव झालेला आहे़ मात्र, आता सामान्यांच्या घराजवळ असलेले हे डास सत्ताधारी नगरसेवकांच्या घरावरही धडकले आहेत़ शिवसेनेच्या नगरसेविका आशा कोते यांचे पती व तालुका शिवसेनेचे अध्यक्ष कमलाकर कोते या आजारावर रुग्णालयात उपचार घेत आहेत़ शहराच्या पूर्व भागात असलेल्या सातभाई मळ्यात प्रत्येक घरात दोनपेक्षा अधिक रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत़ कालिकानगर, बिरेगाव रोड, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, पूनमनगर या भागातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत़ अनेकांना नाशिक किंवा पुण्याला हलवले आहे़ नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनासाठी करण्यात येणारी फवारणी फारच तुटपुंजी आहे़ शहरातील कचरा समस्या सोडवण्याकरता आजही कोणीही गंभीर असल्याचे चित्र नाही़ केवळ तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे़ त्यामुळे आजाराचा फैलाव सुरू आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डीला डेंग्यूचा विळखा
By admin | Updated: December 16, 2015 23:08 IST