विशेष प्रतिनिधी मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साईदर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असणार आहे.श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होण्याची शक्यता असून त्याच दिवशी त्यांच्या हस्ते विमानतळाचेही उद्घाटन करण्यात येईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या विमानतळावरून उड्डाणाची परवानगी नागरी उड्डयण महासंचालकांकडून येत्या चार-पाच दिवसांत मिळेल. त्या दृष्टीने एमएडीसीकडून सर्व कार्यवाही विक्रमी वेळात करण्यात आली आहे, असे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.एमएडीसीने ३०० कोटी रुपये खर्चून या विमानतळाची उभारणी केली असून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानने ५० कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. इतर निधी राज्य शासनाने दिला असून आणखी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कमी खर्चात चांगला विमानतळ उभारल्याबद्दल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने एमएडीसीची प्रशंसा केली असून देशात अन्यत्र या धर्तीवर विमानतळ उभारण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. या विमानतळावर नजीकच्या काळात योगा, ध्यान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.शिर्डीच्या विमानतळावरून सुरुवातीला दररोज सुमारे ५०० प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. शिर्डी-मुंबई हे अंतर विमानाने ३५ मिनिटांत गाठता येईल. मुंबई-शिर्डी ही विमानसेवा अलायन्स एअरलाइनने, शिर्डी-हैदराबाद सेवा जेट एअरवेजने, तर इंडिगोने भोपाळ-नागपूर-शिर्डी सेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे.कोल्हापूर, नांदेड, नाशिकहून विमानसेवा सहा महिन्यांतकोल्हापूर, नांदेड आणि नाशिकहून मुंबईसाठीची विमानसेवा येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. नांदेडहून तर पुढील महिन्यापासून विमान उड्डाण घेईल. पाठोपाठ नाशिकची सेवा सुरू होईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या दौ-यावर जात आहेत. सिंगापूरमध्ये जगप्रसिद्ध चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनलसोबत पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी तांत्रिक सहकार्याबाबत करार होणार आहे.
शिर्डी विमानतळावरच पास अन् प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:59 IST