पाटील म्हणाले, आजही जास्तीत जास्त बाजार समित्या ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आजही या बाजार समित्यांमध्ये सरकारने शेतमालाला जाहीर केलेला हमीभाव दिला जात नाही; परंतु तक्रार करणारा आमच्यासारखा एखादा भेटला तर, हमालांना पुढे करून रिंगण करून तुडवून शेतकऱ्यांना मारण्याचे काम या बाजार समित्यांमध्ये होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या गाडीचे वजन बाजार समितीमध्ये जातानाच करणे गरजेचे आहे; परंतु आजही एकाही बाजार समितीमध्ये ते होत नाही. विक्री झाल्यानंतर खरेदीदार जे वजन करेल ते वजन आम्हाला मिळते आहे; परंतु आमचा शेतमाल आत नेल्यानंतर खरेदी होत नाही. तोपर्यंत चार-आठ दिवस शेतमाल पडून राहिल्याने त्याच्या चोऱ्या होतात. मात्र, त्याची जबाबदारी बाजार समिती घेत नाही.
या बाजार समित्या पवारांच्या नेतृत्वाखाली चालतात. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे चोवीस तासांच्या आत देण्याचा कायदा असताना चोवीस दिवसांनी सुद्धा पैसे देत नाहीत. दोन-दोन महिने आमचे पैसे वापरतात आणि जर आम्हाला गरज असेल व लवकर पैसे पाहिजे असतील तर २ टक्के वटावा कापून घेतात. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची लबाडी आता चालणार नाही.