कर्जत : कर्जत तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी शंकरराव नीळकंठराव देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. माणिकराव नामदेवराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सहकारी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या निधनामुळे अध्यक्षपद रिक्त झाले होते. उपाध्यक्ष माणिकराव मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपाध्यक्षपदही रिक्त होते. या दोन्ही रिक्त जागांवर नव्याने पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. गाधेकर व पी.टी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुका सहकारी दूध संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली.
यावेळी अध्यक्षपदासाठी शंकरराव देशमुख यांचा व उपाध्यक्षपदासाठी ॲड. माणिकराव मोरे यांचा एकमेव अर्ज आला. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आला. त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात येत आहेत. असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
यावेळी बाळासाहेब निंबाळकर, रामजी सूर्यवंशी, अंकुश दळवी, अशोक शिंदे, दादासाहेब खराडे, नवनाथ खेडकर, श्यामराव काळे, अनिल सुद्रीक, पांडुरंग गिरगुणे, प्रकाश गजरमल, दत्तात्रय तनपुरे, छाया मोढळे, रतन खराडे हे सर्व संचालक उपस्थित होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते बप्पासाहेब धांडे, कुळधरण सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील, युवा नेते दादासाहेब सोनमाळी, रुईगव्हाणचे माजी सरपंच राजेंद्र पवार आदींनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचे स्वागत केले.