शिर्डी : साईबाबांच्या देवत्वाला आव्हान देणाऱ्या शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांच्यावर मंगळवारी शिर्डीत काळी शाई फेकून संताप व्यक्त करण्यात आला़दुपारी सव्वादोनच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शिर्डीत दाखल झालेले दंडी स्वामी पाच वाजेपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात बसून होते़ तेथून पोलीस त्यांना बाहेर काढत असताना साईबाबांचा जयजयकार करत एका अज्ञात तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकून संताप व्यक्त केला़ साईबाबा देव नसून त्यांची कोणी पूजा करू नये या शंकराचार्य व दंडीस्वामीच्या भूमिकेमुळे साईभक्तांमध्ये नाराजीची भावना होती़गेल्या २९ जून रोजी दक्षिणेतील रमणानंद स्वामींनी साईबाबांच्या देवत्वाच्या समर्थनार्थ शिर्डीत मेळाव्याचे आयोजन केले होते. याच बरोबर त्यांनी शंकराचार्यांना या विषयावर वादविवादासाठी आव्हान दिले होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून रमणानंद स्वामींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याबरोबर प्रशासनाने दंडी स्वामींना नोटिसा बजावून शिर्डी महसूल क्षेत्रात येण्यापासून रोखले होते. प्रशासनाच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात दंडी स्वामींनी उच्च न्यायायलयाचे दरवाजे ठोठावले होते़ यावर न्यायालयाने दंडी स्वामींना शिर्डीत जाण्यास सशर्त परवानगी दिली होती़ साईबाबा मंदिरात जाणार नाही, माध्यमांशी बोलणार नाही व अशांतता निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य व वक्तव्य करणार नाही, आदी अटींवर दंडी स्वामींना ४८ तासांसाठी शिर्डीत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती़त्यामुळे दंडी स्वामी आज शिर्डीत आले होते. त्यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह परिसरात साध्या वेशातील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ दरम्यान, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ यानंतर दंडी स्वामी पोलीस संरक्षणात औरंगाबादकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले़ ते जात असताना काही नागरिकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या़ दरम्यान दंडी स्वामींनी तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शिर्डीत येण्यापासून मला वारंवार रोखले जात आहे. हा माझ्यावरील अन्याय आहे. (प्रतिनिधी) दंडी स्वामी मंगळवारी दुपारी पोलीस संरक्षणात प्रांत कार्यालयात आले होते़ यावेळी प्रांताधिकारी बाहेरगावी होते़ त्यामुळे स्वामींनी तहसीलदार सुभाष दळवी, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील आदी अधिकाऱ्यांना आपणास शिर्डीत येण्यापासून रोखल्याबद्दल जाब विचारला. ४पाचच्या सुमारास स्वामींनी पोलीस ठाण्यात जाऊन बसण्याचा निर्णय घेतला़ यावेळी त्यांना बंदोबस्तात बाहेर काढत असतानाच अचानक आलेल्या एका तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली व साईबाबांचा जयजयकार करत तो गायब झाला़ दंडी स्वामींच्या विरोधात नागरिकांनी निषेधाच्या घोषणाही दिल्या.
शंकराचार्यांच्या प्रतिनिधीला काळे फासले
By admin | Updated: July 13, 2016 00:34 IST