विसापूर : दोन दिवस विसापूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हंगा नदीसह उखलगाव व सुरेगावकडून येणाºया ओढ्यांना पूर आला आहे. कुकडी कालव्यातूनही शुक्रवारी रात्रीपासून पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवसात जलाशयाच्या पाणी साठ्यात पंधरा टक्के १५० दशलक्ष घनफूट नव्याने पाण्याची आवक झाली. हंगा नदीवर पारनेर तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे व नाला बंडींग भरले आहेत. त्यामुळे पावसाचा जोर दोन ते तीन दिवस सुरु राहिल्यास कुकडी प्रकल्पातील विसापूर मध्यम प्रकल्प पंधरा वर्षात प्रथमच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. विसापूर प्रकल्पाची साठवण क्षमता ९२८ दशलक्ष घनफूट असून आजअखेर सत्तर टक्के म्हणजे ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. विसापूर परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. महिन्यापासून पाऊस शेतकºयांना ज्वारीच्या पेरण्या करुन देण्यास तयार नाही. चार दिवस पावसाने उघडीप दिली तरी शेतात वापसा होत नाही तोच पावसाची हजेरी सुरु होते. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबण्याच्या मार्गावर आहेत. ज्या थोड्याफार शेतकºयांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उखलगाव येथे विक्रमी पाऊस झाल्याने विसापूर परिसरातील पाझर तलाव तुडुंब भरला आहे. विसापूर प्रकल्पात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा झाल्याने विसापूर परिसरासह लाभक्षेत्रातील शेतक-यांना नेहमीप्रमाणे पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, अशी शेतक-यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विसापूर जलाशयात सत्तर टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 13:15 IST