शेवगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात कोटींचे तर वीज वितरणचे दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत असून रस्त्याच्या बाजूचा मातीचा भराव ही वाहून गेला आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पूर हानी मध्ये जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शेवगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, तसेच योजना बाह्य रस्त्यांच्या नुकसान बाबतचा अहवाल पंचायत समितीच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आला. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ७ कोटी ५ लाख रुपये लागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
शोभानगर ते बोधेगाव, बोधेगाव ते वाडगव्हाण, आखेगाव ते सोमठाणे, आखेगाव ते चितळेवस्ती, आखेगाव ते कळसपिंप्री, मुर्शतपूर ते काटेवस्ती, वडुले ते जोहारापूर, सामानगाव ते लोळेगाव, खरडगाव ते वाडगाव, बोडखे वस्ती ते खरडगाव, सोमठाणे ते काटेवाडी, राज्यमार्ग ६१ ते शहाजापूर, वरूर बु. ते भगूर, खरडगाव-सुसरे तालुका हद्द, खरडगाव ते सोमठाणे, वरूर बु. ते अमरापूर, राज्यमार्ग ५० ते जुने खामगाव, हिंगणगाव, सालवडगाव ते खरडगाव, कांबी ते बोधेगाव, कांबी ते सुकळी, हातगाव ते खोलेवस्ती, बालमटाकळी ते मुरमी, बालमटाकळी ते धायगुडेवस्ती, बालमटाकळी ते अर्धपिंप्री, शेकटे ते लमाणतांडा, लाढ जळगाव ते ढाकणेवस्ती, दिवटे ते रामनगर, कऱ्हे टाकळी ते एरंडगाव, वरूर भगूर रस्ता ते शिवरस्ता आदी २९ रस्त्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
रस्त्यांच्या पृष्ठभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेची माती वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. रस्ते दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---
वीज वितरणचे नुकसान असे..
वीज वितरणच्या एकूण २९४ खांबांचे व उच्चदाब ६१, लघुदाब २३२ वाहिन्याचे नुकसान झाले. गावठाण वीजपुरवठा सुरळीत केल्याचे व शेती फिडर भागात पाऊस, दलदल असल्याने खांब उभा करता येत नसल्याचे वीज वितरण उपविभागाचे उपअभियंता एस. एम. लोहारे यांनी सांगितले.