संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (८ मे) रात्री उशिरा धांदरफळ बुद्रूक येथील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या गावातील सहा तर शहरातील एक असे कोरोनाचे एकूण सात रूग्ण संगमनेर तालुक्यात आहेत. लागण झालेली शहरातील महिला कुणाच्या संपर्कात येऊन तिला कोरोना झाला. याचा शोध सुरू आहे. शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बुद्रूक (संगमनेर तालुका) हा परिसर हॉटस्पॉट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी ९ ते २२ मे २०२० रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संगमनेर शहरात भरणारा भाजीपाला, मोंढा बंद संगमनेर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संगमनेर शहरातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी संगमनेर शहरातील भरणारा भाजीपाला, मोंढा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी दिली. शहरात कोठेही भाजीपाला बाजार भरणार नाही. याची सर्व शेतकरी, घाऊक भाजीपाला विक्रेते, रिटेल भाजीपाला विक्रेते यांनी नोंद घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बांगर म्हणाले.
संगमनेर तालुक्यात सात कोरोनाबाधीत रुग्ण; इतरांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 11:39 IST