अहमदनगर : मतमोजणी केंद्राच्या परिसरात केंद्रीय कंपन्यांचा सेंट्रल पॅरॉमिलीटरी फोर्स (सीपीएमएफ), राज्य राखीव दल (एसआरपी) आणि पोलीस कर्मचारी अशा तीन टप्प्यावर विशिष्ट अंतराने पोलीस बल तैनात करण्यात येणार आहे. दोन्ही दल मतमोजणी केंद्राच्या आवारात आणि पोलीस कर्मचारी मतमोजणी केंद्राच्या बाहेरच बंदोबस्तासाठी राहणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या आवारात मोबाईल नेण्यासही मनाई करण्यात आली आहे. एकूण चारशे पोलिसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या आवारात राहणार आहे. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मतमोजणीच्या दिवशी एम.आय.डी.सी. येथील वखार महामंडळाच्या दोन गोदामातील मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्ताबाबत तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा विशेष शाखा बंदोबस्ताचे नियोजन करीत आहे. मतमोजणी केंद्रामध्ये तीन टप्प्यावर पोलिसांच्या विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सेंट्रल पॅरॉमिलिटरी फोर्सची ३० जवानांची एक तुकडी मतमोजणी सुरू असलेल्या केंद्राच्या आतील भागात राहणार आहे. राज्य राखीव दलाची ३० जवानांची एक तुकडी मतमोजणी कक्षाच्या बाहेर आणि केंद्राच्या आवारात राहणार आहे. केंद्राच्या बाहेर २५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. सर्व पोलीस कर्मचारी विशिष्ट अंतरावर राहणार आहेत. मतमोजणी केंद्रावर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असणार आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरही पोलीस दलाचे कर्मचारी राहणार आहेत. मतमोजणी केंद्रावर जाण्यासाठी राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांना पास देण्यात आले आहेत. त्यांनाही मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पत्रकारांसाठी मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतमोजणीची माहिती त्यांना या कक्षात दिली जाईल. त्यांना मतमोजणी केंद्रात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे. विजयी उमेदवाराला मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट नियुक्त करण्यात आले आहेत. तेथे प्रत्येक पॉर्इंटवर दोन-दोन पोलीस कॉन्स्टेबल राहणार आहेत. असा राहील बंदोबस्त सीपीएमएफ तुकडी ३० जवान एसआरपी तुकडी ३०जवान वरिष्ठ अधिकारी ०३ डीवायएसपी ०३ पोलीस निरीक्षक ०७ सहायक/उपनिरीक्षक ३० पोलीस कर्मचारी २५० स्ट्रायकिंग फोर्स ५० पोलीस (५ तुकड्या) एकूण ४०० पोलीस
मतमोजणी केंद्रात तीन टप्प्यावर बंदोबस्त
By admin | Updated: June 27, 2023 15:27 IST