करंजी : पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पडल्या. अनेक गावात नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना सत्तेवर येताच उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिसराला तिसगाव - मिरी - करंजी प्रादेशिक योजना पाणी पुरवठा करते. या योजनेवरही आता नव्या सदस्यांना संधी मिळावी, अशी मागणी नवीन सदस्यांनी केली आहे.
दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. या भागास वरदान ठरलेली व अनेक गावांची तहान भागविणारी तिसगाव - मिरी - करंजी प्रादेशिक पाणी योजना सक्षमपणे चालविल्यास या भागातील गावांची तहान भागू शकते.
पाईपलाईनची फूट - तूट, नियोजनाचा अभाव व अकार्यक्षम कारभारामुळे आजपर्यंत ही योजना कुचकामी ठरली आहे. यामुळे अनेक गावांना वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. योजनेत समावेश असूनही अनेक गावांची तहान भागत नाही. पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कितीही पाऊस झाला तरी उन्हाळ्यात पाणी टंचाई ठरलेली असते. या भागातील कायमस्वरूपी दुष्काळी व पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या २७ गावांना तिसगाव - मिरी - करंजी प्रादेशिक पाणी योजना वरदान ठरलेली आहे.
सदर पाणी योजना स्थानिक संस्था चालवीत असल्याने या योजनेवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अनेक ग्रामपंचायतीत अनेक तरुण सदस्यांना संधी मिळाली आहे. दोन महिन्यांनी येणाऱ्या पाणी टंचाईशी सामना करता यावा, यासाठी ही योजना चालविणाऱ्या संस्थेवरील सर्व पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्याची मागणी या भागातील रवींद्र मुळे, संतोष गरूड, बापू गोरे, संतोष चव्हाण, अशोक टेमकर, विलास टेमकर, तुळशीदास शिंदे, सागर कराळे, आबासाहेब अकोलकर, सुभाष दानवेसह अनेक कार्यकर्त्यांनी व नवनिर्वाचित सदस्यांनी केली आहे.
....
तिसगाव - मिरी - करंजी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले. वेळेवर देखभाल करून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा वेळेवर केला, तर पाणी टंचाईवर मात करू शकतो.
- अशोक टेमकर, नवनिर्वाचित सदस्य.