जिल्ह्यात १ ते ३० जूनदरम्यान ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले. यामध्ये अपहरण झालेल्या लहान मुलांचा, तसेच बेपत्ता झालेल्या महिला व पुरुषांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये १३३ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी ६० गुन्ह्यांतील ६१ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले असून, यात ५१ मुली, तर १० मुलांचा समावेश आहे. २ हजार ७२ प्रौढ व्यक्ती हरवल्याची नोंद आहे. यातील २९९ महिला, तर १३८ पुरुषांना शोधण्यात आले, तसेच रेकॉर्डव्यतिरिक्त दोन सज्ञान व्यक्ती व पाच बालकांचा शोध घेण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशनचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मसूद खान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे, पोलीस नाईक अनिता पवार, रिना म्हस्के, मोनाली घुटे, छाया रांधवन, रूपाली लोहाळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
------------------------------
अल्पवयीन मुलींचा सर्वाधिक समावेश
जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे १३३ गुन्हे दाखल आहेत. यात मुलांपेक्षा मुलींचा सर्वाधिक समावेश आहे. पोलिसांनी शोधलेल्या ६१ पैकी ५१ मुलींचा समावेश आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून, तसेच फूस लावून पळवून नेल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले जाते. बहुतांशी प्रकरणात पोलिसांना या अल्पवयीन मुली दयनीय अवस्थेत मिळून आल्याची उदाहरणे आहेत. तपासादरम्यान पोलिसांना मिळून आलेल्या अल्पवयीन मुलांना कायदेशीर प्रक्रिया करून पालकांच्या स्वाधीन केले आहे. ज्यांना पालक नाहीत त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.