अहमदनगर : महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता नियुक्तीची जबाबदारी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोपविली होती. त्यांनी या वृत्तास दुजाेरा दिला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेता पद संपत बारस्कर यांच्या रूपाने सध्या राष्ट्रवादीकडे होते; परंतु महापालिकेत सत्तांतर झाले. सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मनपातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला होता; परंतु भाजपमध्ये एकमत होत नव्हते. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महेंद्र गंधे यांचे नाव सुचविले असून, तसे पत्र त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोशल मीडियाद्वारे पाठविले आहे. हे पत्र माजी आमदार कर्डिले शनिवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे दाखल करणार आहेत. त्यानंतर महापौरांकडून गंधे यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र देतील.
मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर हे इच्छुक होते. महापौरांनी माजी महापौर वाकळे यांना नियुक्तीपत्र देण्याची तयारी झाली होती; मात्र अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया रोखण्यात आली. तेव्हापासून भाजपमध्ये वाद उफाळला होता. माजी महापौर वाकळे व माजी सभापती कोतकर यांनी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीमही राबविली हाेती. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. हा वाद प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेला. त्यांनी विरोधीपक्षनेता पदाची जबाबदारी माजी आमदार कर्डिले यांच्यावर सोपविली होती. माजी आमदार कर्डिले यांनी मध्यंतरी शहर भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली होती. या बैठकीचा सविस्तर अहवाल त्यांनी पाटील यांच्यासमोर मांडला. प्रदेशाध्यक्ष पाटील व राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात चर्चा होऊन अखेर गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
...
आयबीवर बैठक घेऊन दिली माहिती
राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कर्डिले यांनी शुक्रवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात नगरसेवकांची बैठक घेऊन माहिती दिली.
.....
विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी गुरुवारी पुण्यात चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते व पाटील यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता पदासाठी गंधे यांचे नाव सुचविले आहे. तसे पत्रही प्राप्त झाले असून, हे पत्र शनिवारी महापौरांना दिले जाईल.
-शिवाजी कर्डिले, माजी आमदार, भाजप.