लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सरकारच्या माध्यमातून अहमदनगर शहराला अमृत भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असून, दुसऱ्या टप्प्यातील सावेडी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिली.
स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सावेडी भुयारी गटार योजनेबाबत सोमवारी सायंकाळी आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, मनोज दुलम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आ. जि. सातपुते, सुमित कुलकर्णी, विनोद कुरणपट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते. केेंद्र शासनाच्या भुयारी गटार योजनेंतर्गत जुन्या गावठाण भागात सुरू असलेली योजना पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ४५० कि.मी.च्या उपनगरातील भुयारी गटारीचा समावेश आहे. सावेडीसह इतर उपनगरांत १५० एमएमवरून २०० एमएम व्यासाच्या पाईप टाकाव्यात. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला जाणार आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर भुयारी गटार योजनेचे काम सुरू होईल. त्यामुळे सिना नदीत होणारे प्रदूषण थांबणार आहे. तसेच केडगाव, सावेडी उपनगर, कल्याण रोड उपनगर, नागापूर, बोल्हेगाव, निर्मलनगर परिसरातील भुयारी गटार योजनेची कामे मार्गी लागणार असून, मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे घुले यांनी सांगितले.
..........
फोटो-०८एएमसी
अमृत भुयारी गटार योजनेबाबत महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, संपत बारस्कर आदी पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.