अहमदनगर : जन्मोजन्मी हाच पती लाभावा, यासाठी वडाच्या झाडाला दोरा बांधत प्रार्थना करीत संपूर्ण महिला वर्ग वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करीत होत्या. याचवेळी देशसेवेसाठी सावित्री कन्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न बाळगत परीक्षेच्या माध्यमातून आपला करिअरचा धागा घट्ट करीत होत्या. पोलीस भरतीमध्ये मुलींनी बाजी मारली. महिलांची शनिवारी होणारी धावण्याची स्पर्धा आणि रविवारी होणारी लेखी परीक्षा झाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पुरुषांची चाचणी झाल्यानंतर सहाव्या दिवशी महिला पोलिसांसाठी भरती प्रक्रिया झाली. सकाळी सहापासूनच मुलींनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजेरी लावली. उंच उडी, लांब उडी, शारीरिक चाचणीसाठी मुली सज्ज झाल्या होत्या. वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगत मुली परीक्षेला सामोरे गेल्या. अत्यंत आत्मविश्वास आणि धैर्याने त्यांनी एक एक चाचणी दिली. लांब उडी,गोळाफेक यामध्ये त्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावत चाचण्या दिल्या.मुलींचा प्रतिसादचाचणीसाठी १०६५ मुलींना गुरुवारी बोलविण्यात आले होते. त्यापैकी ७२५ मुलींनी चाचणीसाठी हजेरी लावली. मुलांपेक्षा मुलींचे चाचणीसाठी आलेले प्रमाण चांगले आहे. मुलींना देशसेवेची ओढ आहे. करिअर आणि नोकरीपेक्षाही देशसेवा या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पोलीस सेवा अत्यंत खडतर असुनही त्यांनी हे क्षेत्र निवडल्याने सावित्री कन्यांचे कौतुक झाले.
देशसेवेसाठी धावल्या सावित्रीकन्या...
By admin | Updated: June 13, 2014 01:14 IST