दररोज ५० ते ६० डंपरने वाळू वाहतूक होत असताना गावातील अंतर्गत रस्त्यासह २५ वर्षांनंतर झालेला बारागाव नांदूर ते राहुरी रस्त्यांची अवस्था खराब होत आहे. बारागाव नांदूर येथील काही महिला घरासमोर बसलेल्या होत्या. भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्यावरून वळण घेताना डंपर थेट महिलांच्या अंगावर आला. यावेळी महिलांनी डंपर अंगावर आल्याचे पाहून दक्षता घेतली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. डंपरच्या सुसाट वेगामुळे रस्त्याच्या कडेला असलेले झाकण बाजूला फेकले गेले. या घटनेमुळे बारागाव नांदूर येथील ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला महसूल प्रशासनाने एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीतून मातीमिश्रित वाळू उपसा करण्याची परवानगी दिली आहे. ३०० ब्रास वाळू उपशाची परवानगी असताना ५० ते ६० डंपरमधून हजारो ब्रास वाळू वाहतूक होत आहे.
...................
महसूल प्रशासन कारवाई करणार का?
बारागाव नांदूर गावातील ग्रामपंचायत, सेवा संस्था, तंटामुक्त समिती व समस्त ग्रामस्थ तहसीलदार फसियोद्दीन शेख यांची भेट घेणार आहेत. बारागाव नांदूर ते राहुरी व अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? नदीपात्रात वाळू उपसा थांबविण्यासाठी प्रशासन काय करणार? या प्रश्नांचे उत्तर महसूल प्रशासनाकडून घेतले जाणार आहे.