तालुक्यातील नाऊर व रामपूर या दोन गावांचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी वाळूचा उपसा सुरू झाला आहे. या दोन्ही गावांनी ग्रामसभेमध्ये वाळू उपशाला विरोध करत प्रशासनाला तसे कळविले. मात्र शेजारच्या नदीकाठच्या सर्वच गावांमधून उपसा सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात संपूर्ण नदीपात्र कोरडे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सरकारी नियमानुसार नदीपात्रामध्ये जेसीबी अथवा पोकलेनने वाळू उपसा करता येत नाही. उपशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही व व्हिडिओ चित्रण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र हे सर्व नियम मातुलठाण येथे धाब्यावर बसविण्यात आले आहेत. नदीपात्रात लिलावानुसार वाळू उपशाचे मोजमाप निश्चित करताना थेट जेसीबी व पोकलेन दाखल झाले. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
भीमशक्तीचे नेते संदीप मगर, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सोमवारी प्रांताधिकारी पवार यांना निवेदन देत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. केवळ दिवसा वाळू उपसा करण्याचे निर्देश असताना रात्रभर उपसा केला जात आहे. निश्चित करून देण्यात आलेल्या जागेव्यतिरिक्त कुठेही उपसा करण्यास ठेकेदाराला मज्जाव करावा. तीन फुटांपेक्षा अधिक खोल उपसा करू देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.
----------
फोटो-२२ मातुलठाण वाळू
...
ओळी : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे वाळू उपसा करण्यासाठी दाखल झालेले जेसीबी व डंपर.
----------