अहमदनगर : एम.आय.डी.सी. मधील एका कंपनीमधील रोखपालाने सेल्समनकडे ११ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी दिले होते. मात्र ही रोख रक्कम सेल्समनने बँकेत भरण्याऐवजी लंपास केली. या प्रकरणी कंपनीच्या मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत सेल्समनचा शोध लागलेला नव्हता.एम.आय.डी.सी. भागात सुमो इंडस्ट्रिज प्रा. लि. या कंपनीमध्ये नरसिंह गोविंदराव ओटीकर (मूळ राहणार लातूर, हल्ली राहणार, शनिनगर, कात्रज, पुणे) हा सेल्समनची नोकरी करीत होता. कंपनीच्या रोखपालाने १० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता ओटीकर याच्याकडे स्टेट बँकेच्या एम.आय.डी.सी. शाखेत ११ लाख रुपये रोख भरण्यासाठी दिले. मात्र पैसे भरून तो माघारी आला नसल्याने रोखपालाच्या मनात शंका आली. त्यांनी सेल्समनचा शोध घेतला. मोबाईल बंद असल्याने त्याचा ठावठिकाणाही लागला नाही. अखेर कंपनीचे संचालक जगजितसिंग सुरेंद्रसिंग सोनी (वय ४०, रा. अमित बँक काँलनी, सावेडी) यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कंपनीच्या रोखपालाने दिलेले पैसे बँकेत न भरता परस्पर घेवून निघून गेला आणि रोखपालाचा विश्वासघात केल्याप्रकरणी ओटीकर याच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. फरार ओटीकरचा पोलीस शोध घेत आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे एम.आय.डी.सी. पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांची पंचाईतएम.आय.डी.सी. भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सेल्समन कंपनीच्या बाहेर पडल्यानंतर कोणत्या भागात गेला, याबाबतची माहिती पोलिसांना उपलब्ध होऊ शकली नाही. याबाबत एम.आय.डी.सी.चे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी परिसरातील कामगार, हॉटेल व्यावसायिक, तसेच कंपनीजवळच्या लोकांचे जबाब घेतले. मात्र त्यामध्ये फरार आरोपी नेमका कुठे गेला? याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.
सेल्समनने लांबविले ११ लाख रुपये
By admin | Updated: July 17, 2014 00:32 IST