राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब कोंडाजी साबळे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
साबळे यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद, राहुरी कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारोदारी ट्रॅक्टर दिसत होते. साबळे यांनी सहकार, धार्मिक, शेती, राजकीय या क्षेत्रांमध्ये मोठे काम केले. साबळे यांनी राजकारणाची रामपूर येथून सुरुवात केली. रामपूर सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अनेक धार्मिक, स्वयंसेवी, राजकीय संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.