आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संतोष बंडू लकारे या तरुणाने खोडसाळपणे दुस-या तरुणाच्या नावाने अहमदनगर नियत्रंण कक्षात आश्वी येथे मोठी गर्दी जमल्याची खोटी माहिती मोबाईलवरुन दिली. याप्रकरणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरविल्याने या तरुणाविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार आनंद वाघ यांनी तक्रार दिली आहे. गुरुवारी (७ मे) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदार भाग्यवान यांनी मला सागितले की, आश्वी खुर्द येथील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती फोनवरुन मिळाली आहे. त्याठिकाणी जाऊन योग्य त्या कारवाईच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे मी घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी कोणतीही गर्दी आढळून न येता सर्वत्र शांतता होती. त्यामुळे माहिती दिलेल्या मोबाईलवर संपर्क केला असता तो फोन गावातील संतोष लकारे यांचा असल्याचे लक्षात आले.दरम्यान ८ मे रोजी सकाळी संतोष लकारे यांचा शोध घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने आपणच खोट्या नावाने फोन करुन खोटी माहिती दिल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अफवा पसरविली; आश्वीत तरुणाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:01 IST