कर्जत : भर रस्त्यावर बिनधास्तपणे उभी राहणारी वाहने, सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे कर्जतकर त्रस्त झाले होते. हे चित्र पाहून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहन पार्किंग रेषा (लक्ष्मण रेषा) आखली, तेव्हापासून कर्जतमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
शहरातून राशीन, मिरजगाव, कुळधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. यामुळे वाहनचालक व दुचाकीस्वार यांना मोठी कसरत करावी लागत होती. चारचाकी वाहने रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला लावून कधी तासन् तास, तर कधी दिवसभर ठरावीक मंडळी वाहतूक कोंडी करीत होते. त्यांना रस्त्यावर, रस्त्यालगत व दुकानासमोर वाहन लावू नका, असे म्हटले तर व्यावसायिकांशी ते वाद घालत होते. असे प्रकार अनेक वेळा घडले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. तेवढ्यापुरता फरक जाणवत होता. भर रस्त्यावर वाहने उभी करून मला कोणी काय करू शकत नाही, अशी अनेकांची भावना होती. रस्त्यावर वाहन लावण्यात धन्यता मानत होते. अप्रत्यक्षपणे तसे दाखविले जात होते. याचा त्रास व्यावसायिक, शाळकरी मुलांना तसेच वाहनचालकांना नेहमीच होत होता. यामुळे मुलींची टिंगलटवाळी, छेडछाड असे प्रकार होत असत. सतत होणाऱ्या या प्रकाराला सर्वचजण वैतागले होते.
-----
दंडात्मक कारवाईचा धसका..
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरुवातीला रस्त्यालगत फक्की मारली. नंतर थेट पांढरा दोर लाऊन लक्ष्मणरेषा कायम केली. या लक्ष्मणरेषेच्या आत कोणीही वाहने उभी करू नयेत. दंडात्मक कारवाई होईल, अशा सूचना दिल्या. याबरोबरच वाहने उभी करण्यासाठी बसस्थानक परिसरात जागा उपलब्ध करून दिली. लक्ष्मणरेषेचा धसका बेशिस्त मंडळींनी घेतला. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. डोकेदुखी करणारी वाहतूक कोंडी बंद झाल्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. लक्ष्मणरेषेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. लक्ष्मणरेषेच्या आत कोणतेही वाहन उभे असेल तर त्याचा नंबरसह फोटो घेतला जातो व दंडात्मक कारवाई ऑनलाईन पद्धतीने होते.
----
१८ कर्जत रोड
कर्जत शहरात निर्धारित रेषेच्या बाहेर लावलेल्या कारमालकाला दंड ठोठावण्यासाठी फोटो काढताना पाेलीस कर्मचारी.