निंबळक : नगर - कल्याण रस्त्याची शिवाजीनगर-नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंत अत्यंत दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. चालकांना वाहन चालविणे जिकिरीचे बनले आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, या मागणीसाठी नगर - कल्याण रस्त्यावरील सीना नदी पुलावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालिकेचे स्थायी समिती सदस्य सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना दालनात कोंडू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नगर - कल्याण हा राष्ट्रीय महामार्ग शहरी भागातून जातो. त्यामुळे रस्त्यावर शहरासह बाहेरील वाहनांची वर्दळ असते. सध्या कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर, नेप्ती चौक, आयुर्वेद कॉर्नरपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून ते चुकविताना दररोज वाहनांचे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. कल्याण - नगर - पाथर्डी - निर्मळ राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६१) वरील अहमदनगर बायपास ते सक्कर चौक व स्टेट बँक चौक ते मेहेकरी या १८.५० कि.मी. लांबीमध्ये डांबरी मजबुतीकरणाचे काम, उड्डाणपूल ते सीना नदीपर्यंत दोन्ही बाजूस काँक्रिट गटारीचे काम मंजूर आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने सीना नदीच्या पुलावर सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लेखी पत्र देण्यात आल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.
यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, दिनकर आघाव, जयप्रकाश डीडवानिया, संजय साकुरे, सुबोध कुलकर्णी, गणेश शिंदे, अविनाश पांढरे, राजू ढोरे, सुबोध कुलकर्णी, भालचंद्र सोनवणे, संभाजी लोंढे आदींसह नागरिक उपस्थित होते.
----
१७ सीना आंदोलन
नगर - कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील सीना नदी पुलावर नागरिकांनी रास्ता रोको केला.