राहुरी : येथील माहिती अधिकार संघटनेचे कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या अपहरणाचा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणा सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.
राहुरी येथील मल्हारवाडी रस्त्यावर मंगळवारी (दि.६) अपहरणाचा प्रकार घडला. या रस्त्यावर रोहिदास दातीर व स्कॉर्पिओमधून आलेल्या काही लोकांची चर्चा झाली. यावेळी संबंधितांनी दातीर यांना मारहाण करीत गाडीत टाकले. दातीर हे आरडाओरड करीत असतानाच संबंधितांनी दातीर यांना गाडीत टाकून धूम ठोकली. सदरची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू होते.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके म्हणाले, राहुरी पोलीस यंत्रणा अपहरण प्रकरणाचा कट उघडकीस आणण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करीत आहे. पोलीस अपहरण घटनेचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी दिली आहे.
...............
अपहरण नेमके कशासाठी?
स्कॉर्पिओ वाहनातून दातीर यांना मल्हारवाडी रस्त्याने पुढे न्यायालय रोड मार्गे ते नगर-मनमाड रस्त्यावर गेले असावे, अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे नेमके अपहरण कशासाठी केले? दातीर यांना कुठे नेले असावे? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.