संगमनेर : क्षणाक्षणाला टाळ्या व शिट्यांची जोड... रसिक प्रेक्षकांचा जल्लोष... गणपती बाप्पांचा जयजयकार... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टीवलचा तिसरा दिवस गाजला. मुंबईचा ‘डायनॅमिक्स’ संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित फेस्टीव्हलच्या तिसऱ्या दिवशी राज्यातून आलेल्या ४२ संघांनी राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबईच्या डायनॅमिक्स संघाने ‘हिपहॉप’ नृत्यातून रंगमंचावर सादर केलेल्या कसरती पाहून प्रेक्षक थक्क झाले. उत्कृष्ट वेशभूषा, पदलालित्य, साजेशी रंगछटा, जलद व अचूक हालचाली अशा सर्व अंगाने बाजी मारून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या संघास प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रूपये रोख व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या सँडी अँड डान्स ग्रूपला द्वितीय क्रमांकाचे २१ हजार रूपये, तर संगमनेरच्या बी बॉईज संघाने तृतीय क्रमांकाचे ११ हजार रूपयांचे बक्षीस मिळाले. नवसाधना नृत्यांगणा अकादमी (चौथे), औरंगाबादचा चॅलेंजर्स ग्रूप (पाचवे), नाशिकचा हिरो डान्स संघ (सहावे) यांनाही गौरविण्यात आले. स्कॉर्पियन डान्स संघ, संगमनेरला उत्तम संकल्पनेचे प्रथम, दंत महाविद्यालय, संगमनेरला द्वितीय तसेच उत्तम वेशभूषेत राजस्थानी घुमर, संगमनेरला प्रथम व ध्रूव अकॅडेमीच्या स्टार ग्रुपला द्वितीय क्रमांक देण्यात आला. अध्यक्ष मनिष मालपाणी, उपाध्यक्ष सचिन पलोड, सचिव सतीश लाहोटी, खजिनदार मनिष मणियार यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.प्रशांत करपे यांनी बहारदार निवेदन केले. रोहित मणियार, सम्राट भंडारी, सुदर्शन नावंदर, मिलिंद पलोड, सुमीत अट्टल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST