अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशाबाबत तपासणी करण्यासाठी तलाठी स्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये पाच महसूल कर्मचारी असतील. हे पथक गोदावरी पात्रातील वाळू उपशाबाबत पडताळणी करेल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशामुळे श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ माजला आहे. चार दिवसांपूर्वी मातूलठाण येथील वाळू तस्करांवर पोलिसांना छापा टाकला. मातूलठाण येथील अवैध वाळू उपशाबाबत ‘लोकमत’मधून गेल्या तीन दिवसांपासून वृत्त प्रसिद्ध होत आहे. मात्र, त्याची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेली नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाने कोणतीही पाहणी केली नाही की एक ओळीचाही प्रस्ताव तयार करून कारवाईसाठी वरिष्ठांना सादर केला नाही. मातूलठाण येथील वाळू उपशाबाबत स्वत: जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही चुप्पी साधली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने तर या उपशाकडे सपशेल कानाडोळा केला आहे. मातूलठाण येथील उपशाबाबत काही माहिती नाही, अशाच आविर्भावात गौण खनिज विभाग आहे. याबाबत या विभागाने स्वत:हून कारवाईसाठी किंवा चौकशीसाठी कार्यवाही केली नाही. तीन दिवसांत गौण खनिज विभागाने एका ओळीचीही टिप्पणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली नाही. त्यामुळे प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे.
-------------------
श्रीरामपूर तालुक्यातील मातूलठाण येथील वाळू उपशाबाबत तपासणी करण्यासाठी तलाठी स्तरावर महसूल कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. ते सलग चार-पाच दिवस वाळू घाटांची प्रत्यक्ष तपासणी करेल. नेमका वाळू उपसा कोठून होतो, हा उपसा कोण करत आहेत? लिलाव झालेल्या पात्रातून उपसा होतो की अन्य ठिकाणाहून याबाबत हे पथक पडताळणी करणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर