अहमदनगर: महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सोमवारीही सुरूच राहणार आहे़ महसूल दिनी सुरू झालेल्या संपात जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी वगळता सर्वच कर्मचारी सहभागी असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह , उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय आणि भूसंपादन खात्याचे कामकाज चौथ्या दिवशीही बंदच राहणार आहे़ संपाचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या विविध दाखल्यांवर होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी महसूल दिनाचे औचित्य साधत बेमुदत संप पुकारला आहे़ महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वगळता सर्व कर्मचारी संपात सहभागी आहेत़ त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज गेल्या शुक्रवारपासून बंद आहे़ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून दखल घेण्यात आली नाही़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपावर आहेत़ गेल्या शुक्रवारपासून हा संप सुरू आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये आणि भूसंपादन कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे़ या कार्यालयांशी नागरिकांचा थेट संबंध येतो़ महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखलेही वरील कार्यालयांत मिळतात़ परंतु ही कार्यालयेच बंद असल्याने दाखले मिळणे अशक्य झाले आहे़ महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे़ त्यामुळे विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू आहे़ दाखले देणारे कर्मचारी संपावर निघून गेले आहेत़ संप सुरू होऊन दोन दिवस लोटले़ कर्मचारी सोमवारी येतील आणि दाखले मिळतील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांना होती़ मात्र कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून, सोमवारीही ते संपावर राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ संप सुरुच राहणार असेल तर प्रशासनाने दाखल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे़
महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार
By admin | Updated: August 4, 2014 00:43 IST