शेवगाव : शेवगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा यमुनाबाई ढोरकुले, आरोग्य, शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती शब्बीर शेख यांनी पदांचे राजीनामे मागे घेतल्याने नाराजीनाट्यावर अखेर पडदा पडला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते अरुण लांडे, नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्याशी प्रदीर्र्घ चर्चा केल्यानंतर राजीनामे मागे घेतल्याचे या उभयतांनी स्पष्ट केले. नगरपरिषदेचे कर्मचारी आपले ऐकत नसल्याच्या तसेच मासिक बैठकीत सुचविलेली आपल्या प्रभागातील विकास कामांची इतिवृत्तात नोंद घेण्यात येऊनही आपली कामे होत नसल्याचा आरोप करुन वरील दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे मुख्याधिकाऱ्यांकडे शनिवारी सादर केले होते. या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी ऐकत नसल्याचा आरोप केला. मात्र, त्यांचा रोख नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे असल्याची चर्चा सुरु झाल्याने हा विषय नागरी चर्चेचा बनला. त्यातच निवडणूक झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कामकाजात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे लक्ष दिसत नसल्याच्या तक्रारी असल्याने वरील दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष घुले, अरुण लांडे यांनी राजीनामा दिलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांशी चर्चा करुन नगरपरिषदेचा कारभार अधिक लोकाभिमुख होऊन शहराच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नपूर्वक काम करण्याचा निर्धार जाहीर केला. आपले गैरसमज दूर झाल्याने राजीनामे मागे घेतल्याचा खुलासा उपनगराध्यक्षा ढोरकुले व सभापती शेख यांनी दिल्यानंतर राजीनामा नाट्यावर पडदा पडल्याचे पक्षश्रेष्ठींनी जाहीर केले. उपनगराध्यक्ष ढोरकुले, सभापती शेख यांनी राजीनामे दिल्यापासून शहरात अनेक चर्चांना उधाण आले होते. राजकारणाऐवजी शहरात विकासासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
उपनगराध्यक्ष,सभापती यांचे राजीनामे अखेर मागे
By admin | Updated: June 30, 2016 01:18 IST