मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील बारा दिवसांपासून पावसात कमी अधिक प्रमाणात सातत्य टिकून आहे. यामुळे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरूच आहे. मागील दोन दिवस पावसाचा जोर कमी होत गेला होता. मात्र, मंगळवारी दिवसभर पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. भंडारदरा येथे मंगळवारी दिवसभराच्या बारा तासांत ५० मि.मी. पावसाची नोंद झाली आणि मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा ७ हजार ८५ दशलक्ष घनफूट इतका झाला होता.
हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांतही दिवसभरात पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे मुळा नदीच्या विसर्गात वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता कोतूळजवळील मुळा नदीचा विसर्ग ५ हजार ३२७ क्युसेक इतका होता. मुळा धरणातील पाणीसाठाही सायंकाळी सहा वाजता ५३ टक्क्यांहून अधिक म्हणजेच १३ हजार ६८० दशलक्ष घनफूट इतका झाला होता.
कळसूबाई शिखराच्या पर्वतरांगांतही पावसाचे प्रमाण वाढले. यामुळे वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला असून, सायंकाळी सहा वाजता १ हजार २२ क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे. या पाण्याबरोबर निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे सातत्य दिवसभरात टिकून होते. निळवंडे धरणातील पाणीसाठा सकाळी सहा वाजता २ हजार ३५५ दशलक्ष घनफूट इतका झाला होता.
............
मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांतील पाऊस (मि.मी.)
घाटघर १०६
रतनवाडी १२७
पांजरे १०१
भंडारदरा ९७
वाकी ८१