अहमदनगर : जिल्ह्यात कोणत्याच भागात साथजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. ज्या ठिकाणी साथ उद्भवली असेल ती आटोक्यात आणावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिले.शनिवारी आरोग्य समितीच्या बैठकीत शेलार बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.बी. गंडाळ यांनी जिल्ह्यातील साथ परिस्थितीचा आढावा दिला. यात जानेवारीपासून आतापर्यंत ६७१ रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून त्यापैकी १०० जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे सिध्द झाले आहे. सप्टेंबर महिन्यात दहा रुग्णांना मलेरियाची लागण झालेली होती.जिल्ह्यात आतापर्यंत २३ ठिकाणी साथजन्य आजारांचा उद्रेक झाला असून यात ७ ठिकाणी डेंग्यू संशयित, चिकणगुनीया २, हिवताप १ आणि इतर तापाच्या ७ ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा डेंग्यू संशयितांचा मृत्यू झाला आहे. चालू महिन्यात सोनई (नेवासा), कोसे गव्हाण (श्रीगोंदा), देडगाव (नेवासा) आणि राळेगण म्हसोबा (नगर) यांचा समावेश आहे. शहरी भागात ७२ ठिकाणी आणि ग्रामीण भागात ८३६ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूचा उद्रेक झालेल्या ६१ गावात यंदा हाय अलर्ट घोषित करण्यात आला असल्याचे गंडाळ यांनी स्पष्ट केले.त्यावर उपाध्यक्ष शेलार यांनी वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच साथजन्य परिस्थिती औषधांसह अन्य साधन सामग्री कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणा
By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST