पारनेर : कोरोनामध्ये पारनेर तालुक्यातील अनेक गरजू रुग्ण नगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अशा रुग्णांना जेवणाचे डबे बनवून मोफत वाटप करण्याचा उपक्रम पारनेर येथील पुणेवाडीतील मारुती रेपाळे व कुटुंबीय करीत आहेत.
सध्या पारनेर तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर गेल्या एक-दीड महिन्यापासून आहेत. पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारून त्यात रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र रुग्णांना जास्त त्रास झाल्यास त्या रुग्णांना नगर येथील विळद घाटातील विखे हॉस्पिटलसह वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात येते. यावेळी सगळीकडे लॉकडाऊन असल्याने अनेकदा रुग्णांना व नातेवाईकांना जेवण आणण्यासाठी धावपळ करावी लागते. एखाद्या गरजू कुटुंबाचे हाल होऊ नये, यासाठी पारनेर बाजार समितीचे संचालक व जय माता दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती रेपाळे हे व त्यांचे कुटुंबीय अशा गरजू रुग्णांना जेवणाचे डबे पोहोच करण्याचे काम करत आहेत.
पुणेवाडी येथील असलेले रेपाळे कुटुंबीय नगर येथे राहतात. पारनेर तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांची माहिती समजल्यावर मारुती रेपाळे हे स्वत: रुग्णालयात जाऊन त्या रुग्णांची, नातेवाईक यांची विचारपूस करतात आणि मग त्या रुग्णांना जेवणाचे डबे पोहोच होतात. यासाठी त्यांची पत्नी दीपाली, मुलगा सौरभ, मुलगी राजश्री हे सर्वच मदत करतात. रुग्णसंख्या, नातेवाईक पाहून डबे बनवले जातात. शिवाय रुग्णांना कोणते जेवण पाहिजे यांची डॉक्टरकडून माहिती घेऊन तसा डबा तयार केला जातो. सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत म्हणून नाहीत तर अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असल्याचे मच्छिंद्र डमरे, दत्ता महाराज बोरुडे, राहुल चेडे यांनी सांगितले.
---
आमची परिस्थिती हलाखीची असताना माझी आई दवाखान्यात ॲडमिट होती. तेव्हापासून मी रुग्णांचे हाल अनुभवले आहेत. सध्याच्या रुग्णांना आणि आपल्या पारनेर तालुक्यातील माणसांबरोबर असे प्रसंग घडू नयेत म्हणून आम्ही रुग्णांपर्यंत जेवणाचे डबे पोहोच करून अन्नदानाचे काम करतो. यातच आम्हाला आनंद मिळतो.
-मारुती रेपाळे,
पुणेवाडी, पारनेर
--
मारुती रेपाळे हे गेल्या अनेक वर्षापासून पारनेर तालुक्यातील गरजू रुग्णांना नगर येथील हॉस्पिटलमध्ये जेवणाचे डबे पोहोच करण्याचे काम करतातच. शिवाय अनेक गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन गणवेश, पुस्तके, वह्या घेऊन देतात.
चंदन भळगट,
अध्यक्ष, भारतीय जैन संघटना, पारनेर
---
१४ मारुती रेपाळे
140521\screenshot_20210514-140416_whatsapp.jpg
रुग्णांना मोफत डबे पोहोच करणारे मारुती रेपाळे यांचा फोटो