श्रीरामपूर : येथील नगरपालिका हद्दीमध्ये गौंड समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना शुक्रवारी याबाबत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र पवार, अल्तमश पटेल, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, सोहेल शेख, सैफ शेख, तोफिक शेख, गोपाल वायनदेशकर, सलीम शेख, किरण उईके, चंदनसिंग जुनी, राजा उईके आदी उपस्थित होते.
शहरात गौंड समाजाचे १०० ते १५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात तंबू व पाल टाकून आसरा घेतला आहे. हा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये येतो. त्यांचे वास्तव्य नियोजित रस्त्याच्या हद्दीत येत असल्याने पुनर्वसनाकरिता जागा उपलब्ध व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी शबरी अदिवासी घरकूल योजना राबविण्याकरिता आदिवासी विभागाने मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. पात्र लाभार्थ्यांना २६९ चौरस मीटर चटई क्षेत्र असलेले पक्के घर उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव केलेला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
--------
फोटो ओळी : आदिक
नगराध्यक्षा आदिक यांनी गौंड समाजासंदर्भात मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना दिले.
------